कांद्यासाठी पहिल्यांदाच समृद्धीवर शिवसेना ठाकरे पक्षाचा एल्गार आंदोलन करताच शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना त्याच्या हक्कासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत समृद्धी महामार्गावर ऐतिहासिक आंदोलन छेडले. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील समृद्धी महामार्ग इंटरचेंज क्रमांक १९ वर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

प्रथमच समृद्धी महामार्ग रोखून कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहाटेपासूनच हजारो शिवसैनिक आणि शेतकरी आंदोलनस्थळी जमा झाले होते. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, शेतकर्‍यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकरी विरोधी सरकार हाय हाय अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनामुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या देत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला असून उत्पादन खर्चही निघत नसल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले की, राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आज अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. शेतकर्‍यांना हमीभाव नाही, बाजारपेठ नाही आणि शासनाकडून ठोस मदतही मिळत नाही. त्यामुळे सरकारने तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. शेतकरी बांधव संकटात सापडले आहे. अक्षरशः कांघाला भाव मिळत नसल्याने कांदा फेकून देण्याची वेळ बळीराजावर आली आहे. त्यामुळे वेळीच शेतकरी बांधवाना न्याय द्यावा. अशीही मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी आंदोलनात शिवसेना उपनेते सुभाष पाटील, शिवसेना सहसंपर्कप्रमुख अनिल चोरडिया, उपजिल्हाप्रमुख बबन तात्या जाधव, रमेश सावंत, अविनाश पाटील, अंकुश सुंब, संजय पिंपळे, अरविंद धिवर, कृष्णा पाटील डोणगावकर, तालुकाप्रमुख मनाजी पाटील मिसाळ, संजय मोटे, सुभाष कानडे, दिनेश मुथा, राजू वरकड, विष्णू जाधव, तालुका संघटक मनोज गायके, विधानसभा संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, गणेश अधाने, जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, कल्याण चव्हाण, केतन काजे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी विठ्ठल डमाळे, उमेश मोकासे व अक्षय साठे यांनी सहभाग नोंदविला.

या मागणीसाठी आंदोलन
नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी, कांद्याला किमान २,००० प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, प्रतिक्विंटल १,५०० अनुदान जाहीर करावे, कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवावी, खत अनुदान थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावे, कांदा चाळ उभारणीसाठी ७५ टक्के अनुदान द्यावे, दर्जेदार कांदा बियाणे अनुदानित दरात उपलब्ध करून द्यावे. या मागणीसाठी आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

आंदोलनकर्त्यांना ताब्यात
शिवसेना उध्वस्त बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला परवानगी नाकारली. त्यामुळे गनिमी कावा पध्दतीने समृद्धी महामार्गावर थेट आंदोलन केले. त्यामुळे आंदोलन तीव्र होत असताना वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आणि घोषणाबाजी करत महामार्गावर आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे राज्यातील कांदा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.